पुणे- शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांच्या ‘स्री शक्तीचा जागर’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने राष्ट्र सेवा दलाने केलेला महिला शक्तीचा सन्मान म्हणजे देशाचा, संविधानाचा सन्मान आहे, असे मत संविधान तज्ज्ञ ऍड. संघराज दादासाहेब रुपवते यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ऍड. रुपवते पुढे म्हणाले कि, जेव्हा आपण महिलांचा सन्मान करतो, त्यांना समाजात समान दर्जा देतो, त्यांचे विचार ऐकतो आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सामील करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात संविधानाचे मूल्य जपतो. महिला सक्षमीकरण म्हणजे लोकशाही बळकट करणे होय. आज सर्वच क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि पुरुषांनीही दोन पावले मागे येऊन महिलांना त्यांचे प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे म्हणाले. असे झाल्यास आपण सर्वसमावेशक समाज निर्माण करू असेही ते म्हणाले.
स्री शक्तीचा जागर या पुस्तकाचे पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ,२८ ऑक्टोबरला पुण्यात साने गुरुजी स्मारकात सुशीलाताई दादासाहेब रुपवते यांच्या हस्ते झाले. यावेळी सुगावा प्रकाशनच्या प्रा. उषा विलास वाघ, लेखिका प्राचार्य इंदुमती महावीर जोंधळे, शिक्षिका सुरेखा आडम , सामाजिक कार्यकर्त्या रुबिया अब्दुल शेख यांचा स्री शक्ती सन्मान पुरस्कार देऊन सुशीलाताई रुपवते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांनी केले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे होते. यावेळी ऍड. जाकीर अत्तार उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिकेत घुले आणि रवींद्र मेढे यांनी केले.

लेखक हिरालाल पगडाल यांनी यावेळी मनोगतात सांगितलं की,
राष्ट्र सेवा दलाने मला घडवलं. विचार करायला, तो मांडायला शिकवलं. त्यामुळे मी सामाजिक काम करू शकलो. राजकारणात कृती करू शकलो. लिहू लागलो. त्यातून माझे हे चौथे पुस्तक प्रकाशित झाले.
आजही समाजात महिलांना असमान वेतन, सुरक्षिततेचे प्रश्न, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, तसेच निर्णयप्रक्रियेत मर्यादित सहभाग या अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच अशा पुस्तकांची आणि कार्यक्रमांची गरज अधिक आहे. कारण ते समाजात चर्चेचे वातावरण निर्माण करतात आणि महिलांचे प्रश्न हे केवळ महिलांचे न राहता संपूर्ण समाजाचे आहेत, हे अधोरेखित करतात.
स्त्री हक्क म्हणजे मानवी हक्क – हा संदेश सर्व स्तरांवर पोचविणे, हीच खरी लोकशाहीची दिशा आहे. संविधानाने दिलेले समानतेचे मूल्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षण, जागरूकता आणि साहित्याचे माध्यम अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘स्री शक्तीचा जागर’ या पुस्तकातूनही तेच अधोरेखित होते, असेही पुस्तकाचे लेखक हिरालाल पगडाल म्हणाले.

यावेळी इंदुमती जोंधळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या मुळं महिला शिकल्या. म्हणून आम्ही लिहू बोलू लागलो. सावित्रीबाईंचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. या पुस्तकात सावित्रीच्या लेकींचा कर्तबगारीचा आढावा पगडाल यांनी घेतला आहे. म्हणून हे पुस्तक प्रेरणादायी आहे. उषा वाघ यांनी महिला पुरुष बरोबरीने चालतील तर समाजाची प्रगती लवकर होईल. विषमता संपेल असा अशावाद व्यक्त केला. सुरेखा आडम यांनी शिक्षक म्हणून काम करताना आलेले विषमतेचे अनुभव सांगून उपस्थिताना विचार करायला लावला. रुबिया शेख यांनी समाजकार्याचे अनुभव सांगितले.
मुंबईच्या ललित प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन ॲड. समीर लामखडे यांनी केले.