वारशातून जपलेली लावणी : पवन तटकरेची लावणीगाथा

Pawan Tatkare

अदिती पवार | 28/9/2025

बऱ्याच वर्षांपासून मराठी माणूस व लावणी यांचं जिवाभावाचं नातं आहे. लावणी ही मराठी माणसाच्या काळजाचा तुकडा आहे म्हटलं तरी फारसं वावगं होणार नाही. ढोलकीचा तोडा कानावर पडल्यावर मऱ्हाठी माणूस क्षणात उत्तेजित होऊन ताजातवाना होतो. म्हणूनच वेगळ्या अर्थानं लावणी ही मराठी मनाची राणी समजली जाते.

कितीतरी वर्षे लावणीनं मराठी मनावर राज्य केलं आहे आणि अजूनही करते आहे. अशा लावणीचं कूळ शोधणं वा उगम शोधणं हा ऋषीचं कूळ शोधण्याचा प्रकार होईल; पण फार पूर्वीपासून लावणी लिहिली गेली आहे. मन्मथ शिवलिंग यांनी लावणी लिहिलेली आढळली आहे आणि मन्मथ शिवलिंग यांचा जन्म इ. स. १५६० चा व मृत्यू इ. स. १६१३ म्हणजे त्या काळापासून लावणी सापडते; पण हे जरी असलं तरी लावणीला भरभराट लाभली ती उत्तर पेशवाईच्या काळात त्या काळात खऱ्या अर्थानं लावणीला राजाश्रय मिळाला. लावणी महाराष्ट्राच्या सर्व भागांत निर्माण होत होती. जत्रा किंवा उत्सवाच्या काळात गावोगावी लावणीचे फड उभे राहात. लोक उत्साहानं लावणी ऐकण्यासाठी गर्दी करत. सातारा, कोल्हापूर, बालेघाट, संगमनेर, मराठवाडा, तुळजापूर, मुंबई वगैरे भागांत लावणीची निर्मिती झालेली आढळून येते. या लावणीच्या रचना पाहता लक्षात येतं, की लावणी रचना करणारे शाहीर हे तसे सर्वसामान्य जनसमुदायातील होते. त्याचमुळे लावणीची रचना सर्वसामान्य जनसमुदायाच्या मनोरंजनासाठी व उद्बोधनासाठी केली जात होती. बऱ्याच वेळा लावणी ही अश्लील वा बीभत्स असते असा समज दिसतो; पण तो सर्वार्थानं खरा नाही.

आत्तापर्यंतच्या लावणीकडे पाहिलं, की लक्षात येतं लावणीमध्ये त्या त्या लावणीकारांच्या काळातील समाजजीवन, रीतिरिवाज, भाषा, लकबी या सर्वांचा समावेश आहे. त्यावेळची जीवनपद्धती त्या काळातल्या लावण्यातून सामोरी येते. त्या मागचा आशय हा मराठी मातीतून जन्माला आलेला आणि अस्सल आहे, हे मात्र नक्की.

लावणी म्हटलं की सर्वसामान्यपणे तमाशात म्हणली जाणारी शृंगारिक, नृत्य, गान, नाट्ययुक्त लावणीरचना असाच अर्थ घेतला जातो. लावणीच्या उपलब्ध स्वरूपावरून तसा अर्थ घेतला असावा; पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तमाशाचे जे फड उभे राहतात; त्यांचे निरीक्षण केल्यास आणि लावणीच्या सादरीकरणाचे स्वरूप पाहिल्यास लावणी सर्वथैव शृंगारिक असते आणि नृत्य करून गाणारी स्त्री किंवा पुरुष तिच्यात असतो असे चित्र दिसत नाही, तसेच शृंगारिक विषयावरील रचनला जसे लावणी म्हटले जाते, तसेच पारमार्थिक, आध्यात्मिक विषयावरील रचनेलासुद्धा लावणी म्हणतात. शक्यतो वीररसात्मक, वीरगाथा, पराक्रमवर्णन हे विषय वगळता लावणीला अन्य विषय वज्ये नाहीत. शाहिरी रचनेत लावणी येत असली, तरी लावणीशिवाय शाहिरी रचनेत अनेक वेगळे प्रकार येतात. लावणीत येणारे नाट्य गोंधळी, भराडी, वाघ्यामुरळी, भांड, वासुदेव यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीवरून थोडेफार स्वीकारले आहे. पूर्वी बहुजनसमाजासमोर तमाशात सादर केली जाणारी ही लावणी लोकगीतातील तालठेक्यावर, डफ, एकतारी सारख्या वाद्यांच्या साहाय्याने गायिली जायची. नंतर हळूहळू ढोलकी, तुणतुणं, कडे ही वाद्ये लावणीच्या साथीसाठी स्वीकारली गेली. लोकगीतांमधील पद्मावर्तनी वा भृगावर्तनी ज्या रचना आहेत त्यांच्याशी मिळतीजुळती अशी लावणीची रचना आहे. त्यामुळे लावणी ही पूर्णपणे ‘मऱ्हाटी’ मनाची राणी आहे म्हटलेस वावगे ठरणार नाही. 

लावणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती नऊवारी साडी नेसलेली, गळ्यात सात शृंगार माळा, डोक्यावर पदर आणि पायात घुंगरू बांधलेली देखणी स्त्री, मात्र या पारंपरिक प्रतिमेला अपवाद ठरतोय पवन तटकरे जो जरी पुरुष असला तरी लावणी सादरीकरणात तितकाच निपुण आहे. लोककलेचा वारसा आणि वरदहस्त लाभलेल्या घरात, पवन तटकरे याचा जन्म झाला. ज्येष्ठ कलावंत गोविंद राघो तटकरे यांचा नातू पवन तटकरे. मूळचा कोकणातला असल्या मुळे कला ही त्याचा नसानसात होती. लोककला आणि लोकसंस्कृती, महाराष्ट्र आणि मराठी समाजाचा अविभाज्य भाग आहे. मराठी संस्कृतीच्या समृद्धीचे मूळ हे, याच लोकसंस्कृतीमध्ये दडले आहे. ही लोककला टिकली पाहिजे, यासाठी झटणारे लोक कमीच आहेत; परंतु, पवन तटकरे हे नाव या शिलेदारांमध्ये समाविष्ट करावे लागेल. 

वयाच्या चौथ्या वर्षापासूनच पवनचा ओढा लावणीकडे होता. आपल्या आईच्या मागदर्शनाखाली त्याने नृत्याचे प्राथमिक धडे  गिरवले. नकळत्या वयातच भविष्यातील त्याची वाटचाल कशी असेल यावर शिक्कामोर्तब झाले होते. शाळकरी वयातच पवनचा कृत्यकलेचा पाया रचला जात होता . रूढार्थाने पवनला कुठल्यातरी नृत्यकलेमध्ये फक्त प्राविण्य मिळवायचे नव्हते, तर त्याला लावणी समजून घ्यायची होती. या कलाप्रकारातले अंतरंग, त्याची खोली ही सारे त्याला आत्मसात करायचे होते. आपल्या अंगभूत कलागुणांसोबतच, त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास शिकण्याचा होता, सावरण्याचा होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, स्वतःला घडवण्याचा होता. सगळ्यांप्रमाणे त्याची सुद्धा शिक्षणाची वारी सुरू झाली होती. विज्ञान शाखेत प्रवेश घेत त्याने अभ्यासाला सुरुवात केली. मात्र, फार काळ पवन लावणीपासून दूर राहू शकला नाही. आपले अस्तित्व लावणीशिवाय शून्य आहे, याची प्रचिती त्याला आली. अखेर आपल्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन त्याने, लावणी हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे सांगितले. कलेसाठी आपले जीवन वाहून घेणाऱ्या कलावंतांसमोर आव्हानाचे डोंगर उभे असतात आणि याचीच चिंता त्याच्या पालकांना पोखरत होती. मात्र, त्याला त्याच्या कलेवर विश्वास होता. त्याच्या याच जोरावर त्याने, आपल्या कामाला सुरुवात केली. मुंबईतील माटुंगा येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, अल्पावधीतच त्याच्या वेगळेपणाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. नऊवारी साडी नेसून लावणी सादर करणाऱ्या पवनला बघण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी गर्दी करू लागले. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्याने आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला. एक कलाकार म्हणून स्वतःचे सामाजिक भान जपत त्याने, आपली कला लोकहितासाठीसुद्धा वापरली. ‘राष्ट्रीय सेवा योजना ‘ अर्थात ‘एनएसएस’ च्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये त्याने सक्रीय सहभाग नोंदवला. तरुण वयातच सामाजिक संस्थांबरोबर सामाजिक काम करत त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले .

शिक्षण घेत असतानाच त्याने ‘ संगीतबारी ‘ या विषयावर प्रबंध लिहिला. लावणी ची खरी माहिती, तिचे पारंपरिक रूप, तिचे वेगळेपण, तिचे जतन नेमके कसे केले जाते, या बद्दलची सगळी माहिती पवनने मिळवली.  कोविड च्या काळात त्याच्या एक लावणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याने स्वतःचे चॅनेल सुद्धा सुरू केले आहे. अल्पावधीतच हजारो प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद लाभला. नृत्याचे विविध प्रकार हाताळत तो आपल्या कलेमधील आत नाविन्य जपतो आहे.

गुरु दीपाली विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पवन आता कथ्थक नृत्य शिकत आहे. चित्रपटसृष्टीमध्ये नृत्य दिग्दर्शनाचे कामसुद्धा पवन करतो आहे. पवनला आतापर्यंत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागले. एक ‘मुलगा’ लावणी करतो म्हणून त्याला काही लोकांकडून किती तरी वाईट कमेंट्स, निंदा व बोलणी खावी लागली. पण या सगळ्यांवर मात करून आज पवन कलाक्षेत्रात आपले नाव कमावतो आहे. यशाची पुढची पायरी गाठत ‘ पवन तटकरे डान्स अकादमी ऑफ डान्स’ ची स्थापनाही त्याने केली आहे. लावणीचे सर्वांगीण शिक्षण या अकादमीच्या माध्यमातून, तो आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो. २०२४ मध्ये त्याने स्वतः पुढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांसोबत ‘लावण्योत्सव’ नावाचा एक बहारदार कार्यक्रम उभा केला. २०२५ मध्ये त्याचा दुसरा प्रयोग सुद्धा यशस्वी रित्या पार पडला. त्याचा नृत्याविष्कार बघून, भारावून जाणारे असंख्य लोक आहेत. पण, त्याने केले म्हणजे मी सुद्धा करू शकतो, असा विश्वास बाळगत लावणी शिकणारे मुले व मुलीसुद्धा आहेत.

आपल्या यशाचा श्रेय सहजतेने आईवडिलांच्या पदरात टाकताना पवन म्हणतो की,  “आईवडिलांनी एकदा आपल्यावर विश्वास ठेवला की, अवघड गोष्टीसुद्धा सोप्या होतात. त्यांचे बळ हीच माझी ऊर्जा आहे”. लावणीचे वर्तमान आणि भविष्यावर भाष्य करताना तो पवन म्हणतो की ,

“लावणी आणि एकूणच लोककलेचे भविष्य उज्ज्वल आहे”. लावणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज सन्मान केला जातो, त्यांना प्रोत्साहन केले जाते, पुरुषांना आज रंगमंचावर लावणी करायचा आत्मविश्वास मिळतो.  नृत्य कलेच्या कुठल्याही एका विशिष्ट साच्यात अडकून न राहता, युवा पिढीला वेगवेगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. असच प्रत्येक युवा पिढीने कुठल्याही कलेचा स्वतः शोध घेऊन आणि ती शिकायची आस ठेवली तर आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येईल.”

आपल्या कार्यकर्तृत्वातून लोककलेचा हा अमूल्य वारसा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो आणि तिचं सौंदर्य, सामर्थ्य व जतन करण्याची प्रेरणा समाजाला मिळत राहो हे पवनला मनोमन वाटतं. यासाठीच तो शक्य तसे प्रयत्न करतो आहे. रसिक मायबापांचे प्रेम त्याला येणाऱ्या काळातही अखंडितपणे मिळणार आहे यात शंका नाही.


अदिती पवार या लोककला आणि संस्कृती यावर प्रामुख्याने काम करतात, हा त्यांच्या आवडीचा आणि संशोधनाचा विषय आहे. मराठी समाजातील परंपरा, कला आणि तिच्या जपणुकीवर त्या सातत्याने लेखन करत असतात.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी
  • English
  • हिन्दी
  • मराठी
  • Scroll to Top