सुदर्शन शिंदे | 27 जून 2025
वारी चालणं म्हणजे फक्त पंढरपूर गाठणं नव्हे, तर ती भारतीय संविधानाच्या विचारांशी जोडलेली एक चालतीबोलती लोकशाही आहे. यात श्रद्धा आहे, भक्ती आहे, पण त्याचबरोबर समानता, बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा खरा अर्थही यातून समजतो.
वारी म्हणजे सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ
आषाढी एकादशी जवळ आली की महाराष्ट्रभरून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. ही फक्त धार्मिक यात्रा नाही, तर एक सामाजिक आंदोलन आहे. यात जात, धर्म, वर्ग, वय, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सगळेजण एकत्र चालतात.
वारीचा उगम भक्ती चळवळीतून झाला आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, सोयराबाई यांसारख्या संतांनी केवळ भक्तीच नाही, तर सामाजिक बदलाची प्रेरणा दिली. ते काळात जेव्हा जातीपातीचे भेद प्रचंड होते, तेव्हा त्यांनी सर्वसामान्य लोकांना समतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला.
डॉ. सदानंद मोरे म्हणतात, “वारी म्हणजे लोक जोडणारी एक जाळी आहे.” हे जोडणं केवळ भक्तीचं नाही, तर ते सामाजिक समतेचं प्रतीक आहे.

वारीतून समानतेचा अनुभव
संत तुकारामांनी म्हटलं आहे:
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ”
या अभंगात समानतेचा संदेश आहे, जो भारतीय संविधानाच्या कलम १४ आणि १५ मध्ये दिसतो — म्हणजे सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत आणि कोणावरही धर्म, जात, लिंग यावरून भेदभाव होऊ नये.
वारीत कोण मोठा, कोण छोटा नाही. इथे सगळेजण एकसारखं खातात, झोपतात, चालतात. कोणी श्रीमंत असो किंवा गरीब, वारीत सगळे एकसमान असतात. “माऊली” हा शब्द प्रत्येकाला आपलंसं करतो.
संत चोखामेळा हे दलित समाजातील होते. त्यांनी विचारलं होतं:
“हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा?”
ही वेदना आज संविधानाच्या कलम १७ ने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये अस्पृश्यता बेकायदेशीर मानली आहे. पण वारीत ही समता केवळ कायद्यात नाही, तर कृतीत दिसते.

बंधुत्वाचं प्रत्यक्ष उदाहरण
वारीतील प्रत्येक दिंडी म्हणजे एक लहानसं लोकशाही सरकार आहे. कोणताही प्रमुख नसताना सगळे नियम पाळतात, एकमेकांना मदत करतात. जेवण, पाणी, औषधे, झोपण्याची व्यवस्था सगळं वारकरी आपल्यातल्या सहकार्याने करतात.
लातूरचे शेतकरी गणपती वाघमारे म्हणतात, “वारीत कोण कुणाचा हे विचारत नाही. फक्त चालायचं आणि एकमेकांना सांभाळायचं.” हेच तर संविधानातले बंधुत्वाचे मूल्य आहे.
ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीतील प्रमुख चोपदार राजाभाऊ चोपदार म्हणतात, “जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत समता दिंडीची गरज आहे.” म्हणजेच वारी ही फक्त भक्तीची गोष्ट नाही, ती एक सामाजिक समतेसाठीची चळवळ आहे.
अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य
वारी म्हणजे केवळ चालणं नाही. ती एक गाण्याची, बोलण्याची आणि विचार मांडण्याची जागा आहे. संतांचे अभंग म्हणजे त्या काळातील सत्तेला विचारलेले प्रश्न होते. त्यांनी अन्याय, ढोंग, आणि जातिभेदावर प्रहार केला.
हा सर्व प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं (कलम १९) प्रत्यक्ष उदाहरण आहे. वारीत आजही कीर्तन, भजन, अभंग यांच्या माध्यमातून लोक विचार मांडतात, समाजाला आरसा दाखवतात.
वारीपुढची आजची आव्हानं
वारीचं स्वरूप शुद्ध भक्तीचं असलं, तरी आजच्या काळात तिच्यासमोर काही मोठी समस्या उभ्या आहेत:
- राजकीय हस्तक्षेप – बॅनर, फोटो, प्रचार यामुळे वारीचं पावित्र्य कमी होतंय.
- पर्यावरणाचा प्रश्न – प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे नदी आणि परिसराचं नुकसान होतं.
- गर्दीचं व्यवस्थापन – दरवर्षी वाढणाऱ्या गर्दीमुळे अपघात व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
- सुप्त भेदभाव – वरून सगळं समतेचं वाटतं, पण दिंडीत जबाबदाऱ्या वाटताना अजूनही जाती-लिंगभेद जाणवतो.
वारी ही परंपरा न राहता चालतं-बोलतं संविधान बनली आहे. इथे कायद्याचे मुद्दे केवळ पुस्तकात नाहीत, तर रस्त्यावर, पावलोपावली अनुभवले जातात.
जोपर्यंत वारी आहे, तोपर्यंत समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांची जिवंत अनुभूती आपल्याला मिळत राहील. वारी ही आपल्या लोकशाहीची खरी चाचणी आहे — शांत, पण ठामपणे चालणारी!