आशा सेविका, भारताच्या आरोग्यसेवेचा भक्कम कणा

ASHA Marathi Cinema

दिव्या चव्हाण | 8 सप्टेंबर 2025

आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. पण प्रत्यक्षात पाहिलं, तर ग्रामीण भारतातील लाखो लोकांसाठी ही सुविधा अजूनही एक स्वप्नच आहे.अजूनही गावखेड्यात प्राथमिक रुग्णालयं मैलोन्-मैल दूर असतात. गावात अजूनही तुम्हाला मोजके डॉक्टर आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा पाहायला मिळतात. या अभावग्रस्त परिस्थितीत, एक व्यक्ती मात्र न थकता लोकांची सेवा करत असते — ती म्हणजे गावातील आशा सेविका. संघर्षाने भरलेल्या आशा सेविकांचा प्रवास पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकला आहे. चला तर जाणून घेऊया, हा सिनेमा कोणत्या विषयांवर भाष्य करतो.

‘आशा’ (THE HOPE) हा चित्रपट एका मुलीच्या व्यक्तिरेखेतून आशा कार्यकर्तीचं जग उभं करतो. नायकाच्या नजरेतून तिचं योगदान, तिचा संघर्ष आणि तिची जिद्द उलगडतो. खरं तर,आशा सेविका भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अदृश्य पण तितकाच भक्कम कणा आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही; तर तो आपल्याला आठवण करून देतो की गावागावात अविश्रांतपणे काम करणाऱ्या या महिलांना जो पर्यंत आपला समाज मान्यता देत नाही तोवर आपल्या देशाची विकासाची कथा अपूर्णच राहणार आहे.

आशा कार्यकर्त्या कोण आहेत?

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत (NRHM) आशा स्वयंसेविका योजना राबवली जाते. आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटक यांच्यामध्ये आरोग्य विषयक जनजागृती करणे, सुसंवाद घडवणे, समन्वय साधणे, प्रोत्साहन देणे आणि सहभाग निर्माण करणे या दृष्टीने आशा स्वयंसेविका काम करतात. आशा स्वयंसेविका ही त्या गावातीलच स्थानिक स्त्री असते. गावातील आरोग्य समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी ती पुढाकार घेते असते. खरे तर आशा म्हणजे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती. २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू झाला.या योजनेमागचा उद्देश साधा पण क्रांतिकारी होता — प्रत्येक गावात एक प्रशिक्षित महिला आरोग्य कर्मचारी असावी, जी गावकऱ्यांना आणि आरोग्य यंत्रणेला जोडणारा दुवा बनेल.ज्या उद्देशाने ही योजना सुरु झाली, त्याचे परिणाम आता गावाखेड्यात जाणवू लागले आहेत.

आज देशात १० लाखांहून अधिक आशा कार्यकर्त्या कार्यरत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा सामुदायिक आरोग्य उपक्रम ठरला आहे. प्रत्येक आशा कार्यकर्ती स्वतःच्या गावातूनच निवडली जाते. म्हणूनच ती गावकऱ्यांना ओळखीची असते, त्यांचा विश्वास मिळवते आणि गरजेच्या वेळी सर्वप्रथम हीच मदतीसाठी धावून येते.

महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविका

BBC च्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आदिवासी जिल्ह्यांमध्ये प्रत्येक १,००० लोकांमागे एक आशा कार्यकर्ती आणि बिगर-आदिवासी जिल्ह्यांमध्ये प्रत्येक १,५०० लोकांमागे एक आशा कार्यकर्ती नियुक्त केली जाते. आशा स्वयंसेविकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहे. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे लोकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणे आणि उपचारासाठी मदत करणे. त्यात खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • कुटुंब कल्याण योजना प्रचारित करणे
  • माता आणि बालकांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे — प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या, योग्य आहाराबाबत सल्ला देणे.
  • जन्म व मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे
  • किरकोळ आजारांवर प्राथमिक औषधोपचार देणे
  • नागरिकांना आरोग्य केंद्रांवर तपासणीसाठी आणणे
  • लसीकरणासाठी जनजागृती करणे आणि केंद्रांवर मदत करणे

कोरोनाकाळातील आशा सेविकांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. जेव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीच्या सावटाखाली होते, तेव्हा आशा ताई आपल्या जीवाची पर्वा न करता गावाखेड्यात कार्यरत होत्या. अतिशय तुटपुंज्या मानधनात आशा सेविकांनी आपली भूमिका निभावली.

कोविड-१९ महामारीदरम्यान आशा कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सर्वेक्षण केलं. कोरोना काळात कुटुंबातील सदस्य कोणत्या आजारांनी त्रस्त आहेत, वयोवृद्ध लोकांची आरोग्य स्थिती कशी आहे? होम क्वारंटाईन रुग्णांची लक्षणं काय आहेत? याची चाचपणी करून त्याचे रिपोर्ट आरोग्य विभागाला पोहोचवण्याचे काम आशा सेविकांनी केले होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर होती.ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे आशा सेविकांनी पार पडली होती.

शिक्षण, पात्रता आणि प्रशिक्षण

  • आदिवासी क्षेत्रात — किमान शिक्षण: आठवी पास
  • बिगर-आदिवासी क्षेत्रात — किमान शिक्षण: दहावी पास
  • वय: २० ते ४५ वर्षे
  • वैवाहिक स्थिती: विवाहित स्त्री

इच्छुक उमेदवारांकडून अर्ज घेऊन ग्रामसभा तीन उमेदवारांची नावे सुचवते आणि त्यांपैकी एकाची निवड होते. तालुका आरोग्य अधिकारी नियुक्ती पत्र देतात. यानंतर २३ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यात आरोग्यसेवा, कुटुंब कल्याण योजना, मातृ-शिशु आरोग्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन असतं.

‘आशा’ (The Hope) — चित्रपट

आता तुम्हाला कल्पना आली असेल की, हा सिनेमा ज्या वर्गावर आधारित आहे तो वर्ग म्हणजे ‘आशा’ सेविका. आशा सेविकांच्या प्रश्नांना आजवर कुणीही हात घातला नव्हता.मराठीत कलाविश्वात पहिल्यांदाच असा सिनेमा बनला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बाळू पाटील यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शक दैवता पाटील चव्हाण या आहेत. ग्रामीण भारतातील आशा सेविकांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्याग आणि समाजासाठीची सेवा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे प्रभावीपणे आणली आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे रिंकू राजगुरू. तिने अत्यंत मेहनतीने आशा सेविकेची भूमिका पार पाडली आहे. ‘आशा’ या चित्रपटाला यावर्षी सर्वोत्कृष्ट अंतिम फेरीतील चित्रपटाचा राज्य पुरस्कार मिळाला. तसेच, अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाबद्दल अनेक समीक्षकांनी भरभरून लिहिले आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच, आशा सेविकेचा दिवस पहाटेच्या गडद अंधारात सुरू होतो. गावातील गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी तिची धावपळ सुरु होते. आशा सेविका गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसंबंधी माहिती देते आणि अनेकदा त्यांना आरोग्य केंद्रात स्वतः घेऊन जाते. हे अंतर तिला पायी, सायकलवर किंवा सार्वजनिक वाहनाने पार करावं लागतं. दिवसाच्या शेवटी ती लसीकरण नाकारणाऱ्या पालकांची समजून घालते, स्वच्छतेबाबत ग्रामसभेत प्रबोधन करते. तसेच आरोग्यावरून झालेल्या घरगुती वादांत चक्क मध्यस्थीदेखील करते. संध्याकाळी ती स्वतःच्या घरात परतून कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. स्वतःच घर आणि समाज या दोन्ही पातळीवर काम करताना तिला येणारा अनुभव, संघर्ष या चित्रपटात चित्रित केला गेलाय.

संघर्षाची कहाणी

आशा कार्यकर्त्यांचा सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे मानधन. कागदोपत्री त्या “स्वयंसेविका” म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे पगारी नोकरीचा दर्जा त्यांना मिळत नाही. त्यांना फक्त दरमहा थोडं मानधन आणि ठरावीक कामासाठी प्रोत्साहनपर रक्कम मिळते.आशा सेविकांच्या आर्थिक परीस्थितीवर हा सिनेमा भाष्य करतो. खरे तर आशा सेविकांचे मासिक उत्पन्न साधारण ₹३,००० ते ₹६,००० असते. तसेच रुग्णालयात प्रसूती घडवून आणली तर त्यांना ₹६०० रुपये प्रोत्साहनप्र भत्ता दिला जातो. आशा सेविकांना मिळणारी ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. अनेकदा वाहनखर्च, औषधं खरेदी यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे घालावे लागतात. त्यामुळे अनेक आशा कार्यकर्त्या कर्जबाजारी होतात. ही सगळी संघर्षगाथा या चित्रपटात मांडली गेलिया आहे.

आशा’ चित्रपट फक्त एका कार्यकर्तीची गोष्ट सांगत नाही, तर ग्रामीण भारतातील लाखो आशा स्वयंसेविकांचा संघर्ष, बलिदान आणि दृढनिश्चय उलगडण्याचा प्रयत्न करतो. समाजातील बदल फक्त धोरणांवर अवलंबून नसतात; तर ते या महिलांच्या शांत पण जिद्दी कामावरही अवलंबून असतात. ही कथा प्रेक्षकांना ही जाणीव करून देते की प्रत्येक आशा कार्यकर्ती समाजासाठी किती मौल्यवान आहे.यातून प्रेक्षकांना प्रेरणा मिळते की, योग्य मान्यता, सन्मान आणि संसाधनं दिल्यास समाजाची खरी प्रगती साध्य होऊ शकते.
सध्या हा चित्रपट प्रेक्षागृहात आला नसून विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजतो आहे.


दिव्या चव्हाण या मुक्त पत्रकार असून समाजातील उपेक्षित घटक, ग्रामीण आरोग्यसेवा आणि महिला प्रश्न यांवर त्या लेखन करतात. वस्तुनिष्ठ निरीक्षण आणि संवेदनशील दृष्टिकोनातून त्या सामाजिक वास्तव मांडतात.

एकवचनी: 1 विचार “आशा सेविका, भारताच्या आरोग्यसेवेचा भक्कम कणा”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी
  • English
  • हिन्दी
  • मराठी
  • Scroll to Top