पुर्वीच्या काळात अन्नाच्या शोधात निघालेल्या प्रत्येकाला ‘भटके’ म्हणुन संबोधले जायचे. हेच भटके समुह उदरनिर्वाहासाठी जे काम करत त्यावरुन त्यांची जातीच्या विळख्यात गणना झाली आणि जातीनुसार त्यांचा समाजातील स्तर निश्चित झाला. महाराष्ट्रात भटक्या जातींमध्ये मसानजोगी, गोंधळी, मदारी, डोंबारी, वासुदेव आणि इतर अनेक जातींचा समावेश होतो. हे भटके विमुक्त पोटाच्या खळगीसाठी आपल्या मुळ गावापासुन दुर जाऊन जिथे काम मिळेल तिथे वास्तव करतात. त्यांचा प्रवास हा अन्नासाठी असला तरी त्या अन्नातुन त्यांना आवश्यक असलेले पोषकत्व मिळते का? हा प्रश्न गंभीर आहे.
काही महिन्यांपुर्वी मुंबईमध्ये कोरो इंडिया या संस्थेने भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर उपाययोजना व्हाव्यात यासाठी संवाद यात्रा आयोजित केली होती. यावेळी उपस्थित भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसंबंधी प्रत्यक्षात चर्चा केल्यावर महिलांचा पोषक आहार आणि त्यामुळे उद्भवलेले शारिरीक प्रश्न गंभीर असल्याचे लक्षात आले. मुळात अज्ञान आणि गरीबीमुळे पोषक अन्न काय याची व्याख्याच या समाजाला अपरिचित आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातुन भुक शमवण्यासाठी जे मिळते तेच पोषण आणि तोच जगण्याचा मार्ग असे या महिलांचे मत असल्याचे लक्षात आले.
वाढत्या वयानुसार आहारविषयक गरजा बदलत जातात. वयानुसार शरीराची रचना, शरीराकडून केली जाणारी कामे आणि वाढीचे टप्पे बदलत जातात. त्यामुळे साहजिकच शरीराला आवश्यक असलेल्या पोषणाच्या गरजांमध्येही बदल होत जातो. म्हणूनच वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये आहारात विविध प्रकारच्या पौष्टिक घटकांचा समावेश असणे गरजेचे असते. योग्य वयात योग्य पोषण झाल्यास शारीरिक व मानसिक विकास चांगला होतो.
विशेषत: स्त्रियांच्या शरिरासाठी लोह, जीवनसत्व, कॅल्शियमयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. कारण, बाळंतपण, मासिक पाळी, रजोनिवृत्ती या आयुष्यातील नैसर्गिक घडणीमध्ये स्त्रियांना शारिरीक स्वास्थ सुदृढ राखण्यासाठी यासर्वाची गरज असते. ज्यामुळे त्यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त वाढत्या वयानुसार उद्भवणारे मधुमेह, हाडांचे आजार, रक्तदाब, हृदयविकार, मेंदूविकार, ज्ञानेंद्रियांचे विकार यांपासुन वाचण्यासाठी उत्तम आहार गरजेचा आहे. ज्यात दैनंदिन डाळ, कडधान्ये, तृणधान्य, ओल्या भाज्या, फळ, सुकामेवा या गोष्टींचा समावेश असणे गरजेचे आहे.
मात्र पोटाची खळगी भरणे एवढेच ध्येय असलेल्या भटक्या विमुक्त समाजापुढे पोषकत्व हा मुद्दाच ग्राह्य धरता येत नाही. कारण दिवसभरात केलेल्या कामावर पगार मिळणाऱ्या या समाजाकडे काम नसलेल्या दिवशी अन्न शिजेल अशी शाश्वती नाही. तसेच सरकारी योजनांबद्दल अपुरी माहिती असल्याने हा समाज शिक्षण, अन्न, निवारा या मुलभूत सुविधांचा लाभार्थी म्हणुन मागे राहिलेला दिसुन येतो.
महाराष्ट्र सरकारद्वारे गटीत केलेल्या समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भटके आणि विमुक्त यांसाठी विविध योजना दिसतात. मात्र त्यात महिलांसाठीच्या खास योजनांचा अभाव आहे. या अभावामुळेच कदाचित या समाजातील स्त्रियांना पोषक आहारापासुन वंचित राहावे लागत आहे. दुसरी महत्त्वाची बाजु म्हणजे कामानिमित्त गावच्या गावं भटकंती करावी लागत असल्याने या समाजाकडे रेशनकार्डची सोय नाही. तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी ओळखपत्रे ही नाहीत. त्यामुळे दर महिन्याला सरकारकडुन मिळणारा मोफत शिधा यांना मिळत नाही. तसेच एखादी महिला गरोदर असेल किंवा बाळंत माता असेल तर अंगणवाडी मार्फत मिळणारा सकस आहारही तिला मिळत नाही. या स्थितीमुळे स्त्रियांच्या शारिरीक अपोषकतेचा परिणाम केवळ त्या एका महिलेवर न होता पुढच्या पिढीवर देखील आपोआप होतो. तसेच वाढत्या शरीर बदलांमध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या अभावामुळे महिलांचा जीव दगावल्याची ही घटना काहीशा प्रमाणात घडल्याचे लक्षात येते. दुसरी बाजु म्हणजे शेती हीच मुख्य ओळख असलेल्या देशात स्त्रियांच्या सकस आहाराविषयी उद्भवलेला हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. मग ती स्त्री मागास आणि भटक्या विमुक्त समाजातील असेल तरीसुद्धा!
