‘संविधान दिंडी’ला आधुनिक बडवे विरोध का करतायेत?

डॉ. सागर भालेराव | २२जून, २०२५

महाराष्ट्र देशाची ओळख ही संतांची भूमी, समतेची भूमी अशी आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संत परंपरा होती म्हणून लोकशाहीचे रोपण करणे सुखकर झाले. संत परंपरेने जातीव्यवस्था खिळखिळी केली. वैष्णवांचा धर्म ‘एकमेका लागतील पायी रे’ असं म्हणत वैदिक परंपरेला मूठमाती देत होता. कधी एके काळी ज्या संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना ज्या परंपरेने वेदाभ्यास नाकारला, ज्यांच्या जाचामुळे संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाईंना आपले आईवडील गमवावे लागले तेच लोक आता पुन्हा आपले जहरी डोके वर काढताना दिसत आहेत. निमित्त आहे संविधान दिंडीचे.

महाराष्ट्रातील पुरोगामी मंडळी दरवर्षी महात्मा फुल्यांच्या समता भूमीतून ‘संविधान दिंडी’ काढतात. ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ असा प्रकल्प जवळपास दीड दशके चालवला जातो आहे. पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रभरातून समतेचा विचार मानणारे लोक एकत्र येतात आणि संत विचारांचा जागर घालतात. आता पुरोगामी लोक नास्तिक असतात अशी काही कुजबुज मोहीम संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना वाळीत टाकलेल्या समुदायाने सुरु केली आहे. हेच तेच अधर्मी आणि धर्माचे ठेकेदार होते ज्यांनी आजवर विटाळ पाळला, अस्पृश्यतेचा पुरस्कार केला. तत्कालीन अस्पृश्य, हरिजनांना विठोबाचे दर्शन घेण्यास मज्जाव केला. आज त्यांना ‘संविधान दिंडी’ खुपते आहे. पंढरपूरचे बडवे मंदिराच्या कामकाजातून बरखास्त झाले असले तरी त्यांचा जहरी विचार पुण्यातील काही मंडळी पुढे नेत आहेत. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आधुनिक बडवे म्हणत आहेत कि, “गेल्या काही वर्षांपासून देवाला न मानणाऱ्या नास्तिक संघटनांचे पदाधिकारी-सदस्य हिंदूंच्या देवी-देवतांना शिवीगाळ करणाऱ्या संघटनांचे अनुयायी, लोकायतसारखी नक्षलवादी व्यक्तींना सहकार्य करणारी संस्था व तत्सम संघटना ‘संविधान दिंडी-पर्यावरण वारी’ व तत्सम बुरखा पांघरून पंढरपूर वारीत दाखल होत आहे.” ही मानसिकता खरे तर आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते. याच मानसिकतेच्या लोकांनी संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणी नदीत सोडल्या, याच प्रवृत्तीच्या लोकांनी संत तुकारामांचा खून केला. याच प्रवृत्तीच्या लोकांनी संत चोखोबाला विठोबा मंदिरात प्रवेश केला म्हणून मारहाण केली. आज हेच लोक आपल्याला ज्ञान देत आहेत.

‘संविधान दिंडी’ला विरोध करताना, हा शहरी नक्षलवादी गटाचे षड्यंत्र असल्याचा आरोपदेखील आधुनिक बडव्यांनी केला आहे. ज्यांना संविधान मान्य नाही, ज्यांना संविधानिक मुल्ये मान्य नाहीत, ज्यांना उपासना स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहित नाही असे लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत. संत परंपरेचा विचार भारतीय संविधानात आला आहे. संतांना अभिप्रेत असलेला विचार भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला देण्याचा प्रयत्न करते. संत साहित्याने सुरू केलेली समतेची परंपरा ‘संविधान दिंडी’च्या माध्यमातून आजही सुरु आहे. आधुनिक बडव्यांना हे मात्र माहिती नसेल कि, संत साहित्यावर ज्यांनी कुणी सर्वाधिक अभ्यास केला आहे अशी सगळी मंडळी आज संविधान दिंडीच्या बाजूने उभी आहेत आणि सहभागीदेखील आहेत. खरे तर संविधानवादी सर्वांनाच अशा धमक्यांना, तक्रारींना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मात्र भागवर धर्माची जी पताका संत चोखामेळा, संत बंका महार, संत मुहम्मद शेख यांना एकत्र घेऊन समतेचा आणि ममतेचा विचार पुढे नेत आहे, त्याच भागवत धर्माला राजकीय रंग देण्याचे काम पुण्यातील काही टगे करत आहेत. या सर्व टग्यांना खरे तर कधीतरी संविधान दिंडीच्या कीर्तनात बोलावले पाहिजे. आपले काम त्यांना समजावून सांगितले पाहिजे. भरकटलेला व्यक्ती कधी न कधी सरळ मार्गावर येईल हा संविधान मानणाऱ्या सर्वांना विश्वास आहे.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी
  • English
  • हिन्दी
  • मराठी
  • Scroll to Top