समाजवादी कामगारांच्या निर्धार मेळाव्यातील खा. शरद पवार यांचे भाषण
ज्येष्ठ कामगार नेते व माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मानणाऱ्या समाजवादी विचारांच्या कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात ‘जॉर्ज’ नावाच्या एका तडफदार नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या दृष्टीची आजच्या संसदीय लोकशाहीवादी भारताला असलेली गरज अधोरेखित केली.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कपिल पाटील, जॉर्ज साहेबांबरोबर ज्यांनी अनेक वर्ष घालवली व त्यांना साथ दिली असे सुभाष म्हाळगी, संजीव पुजारी, शंकरराव साळवी, अन्य सहकारी आणि उपस्थित बंधू- भगिनींनो…
देशाच्या राजकारणातल्या एका वादळी व्यक्तिमत्वाचं स्मरण आज आपण या ठिकाणी करतोय. आजचा दिवस हा २५ जून स्वातंत्र्यानंतर मूलभूत लोकशाहीच्या अधिकारांच्या दृष्टीने प्रथम या देशामध्ये एक मोठं संकट लोकांनी पाहिलं, तो हा आजचा दिवस आहे. देशाच्या इतिहासातला हा दुर्दैवी दिवस आहे. पण या दुर्दैवी दिवसात सुद्धा चित्र बदलण्यासाठी पडेल ते त्याग करण्याची तयारी लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी दाखवली. त्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा उल्लेख हा अगत्याने करावा लागेल.
मोठं गमतीदार व्यक्तिमत्व आहे. जन्म मेंगलोरचा, आले मुंबईला! घरदार काहीच इथं नाही. कुठे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर किंवा अन्य ठिकाणी विश्रांतीसाठी अंग ठेवायला छतही नाही. अत्यंत हालाखीच्या स्थितीत जॉर्जचा सुरुवातीचा काळ गेला. पण एक गोष्ट त्यांनी केली. कष्टकरी माणसाच्या हिताची जपणूक हे आपल्या जीवनाचे सूत्र जॉर्ज साहेबांनी ठेवलं. आम्ही भेटत असू, चर्चा करत असू. मोठी गंमत वाटायची त्यांच्याशी बोलताना की, कसलीही शैक्षणिक आणि सांपत्तीक पार्श्वभूमी नसताना हे व्यक्तिमत्व असं होतं की, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांची मूळ भाषा ही तुलु, कोकणी, उर्दू उत्तम येत होतं. कानडी, मराठी, हिंदी, इंग्रजी. त्या कालखंडामध्ये मी दोनच राज्यकर्ते केंद्र पातळीवरचे पाहिले की, जे देशाच्या अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. एक नरसिंहराव आणि दुसरे जॉर्ज फर्नांडिस!
जॉर्जचं घर म्हणजे पुस्तकांचं घर होतं. कधी तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर दुसरं काहीही नाही. जी जागा असेल त्या ठिकाणी कुठलंतरी पुस्तक असे. अनेक वेळेला आम्ही पाहिलं जॉर्ज दिल्लीवरून निघाले इथे यायला. त्यांची नेहमी शेवटची फ्लाईट असायची. शेवटच्या फ्लाईटमध्ये बसल्यानंतर केंद्रामध्ये मंत्री असतानासुद्धा विमानातली शेवटची सीट जी आहे ती जॉर्जची असायची. कधीही क्लास वनच्या सीटवर जॉर्जला बसलेलं मी पाहिलं नाही. ते शेवटच्या सीटवर बसायचे आणि बरोबर कामाचे कागद किंवा कुठलंतरी पुस्तक. दिवसातला काही मिनिटांचा कालखंड सुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही, हे त्यांचं सूत्र होतं. राजकीयदृष्ट्या वैचारिक स्पष्टता ही अत्यंत स्पष्ट होती. त्याचं महत्त्वाचं कारण डॉ. राममनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण अशा थोर ज्येष्ठ सेवकांच्या विचारांचे पाईक म्हणून जॉर्जने आपल्या आयुष्याचा कालखंड दाखवला.

मुंबईमध्ये आल्यानंतर ते रणजीत भानू यांच्या घरी निवासस्थानाला होते. इथे आल्यानंतर त्यांनी ‘मुंबईतला जो कष्टकरी आहे, त्याच्या हिताची जपणूक!’ हे आपल्या जीवनाचे सूत्र ही भूमिका अखंड पाळली. आज या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान आपण केला. त्या सन्मानामध्ये त्या सगळ्या सहकाऱ्यांनी जॉर्जला, कामगारांना प्रचंड साथ दिली. पण या मुंबईमध्ये इन्शुरन्स कामगार युनियन असेल, टॅक्सी युनियन असेल किंवा अन्य महत्त्वाच्या संघटना असतील. ज्यांनी कष्टकरी माणसांच्या हिताची जपणूक अखंडपणाने केली. या सगळ्या संस्था उभं करण्याचं ऐतिहासिक काम कुणी केलं? हा प्रश्न विचारला तर जॉर्जचं नाव पहिलं येऊ शकेल, याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. हे सगळं करत असताना एक प्रकारच्या विधायक कामाचा दृष्टिकोन हा त्यांनी कधी सोडला नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘Bombay Labour Co-Operative Bank’ आज ही बँक उभी करण्याबद्दल जॉर्ज साहेबांचे प्रयत्न हे अत्यंत मोलाचे होते आणि ती बँक यशस्वी झाली. कामगारांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभी राहणारी एक हक्काची संस्था झाली. त्याचा लाभ या शहरातल्या आणि आजूबाजूच्या अनेक कष्टकरी लोकांनी अनेक वर्ष घेतला. त्याचं श्रेय हे जॉर्जला दिल्याशिवाय आपल्याला राहता येणार नाही.
आणीबाणीचा कालखंड हा त्यांच्या जीवनातला अत्यंत कठोर आणि कठीण कालखंड होता. भूमिगत झाले, बडोदा डायनामाईट केसमध्ये ते सहभागी झाले. त्यासाठी लागणारी साधनं ही त्यांनी जमा केली. त्यांना अरेस्ट केलं गेलं आणि अतिशय यातना सहन कराव्या लागतील अशी स्थिती त्यांची त्या काळामध्ये झालेली होती. त्यावेळचं जे सरकार होतं, त्या सरकारने त्यांची ही भूमिका यत्किंचितही मानली नव्हती. एवढंच नाही तर जॉर्जसारख्या विचारांचे अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात होते. त्या सगळ्यांनी या देशाची लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड त्याग केलेला होता. त्यामध्ये जॉर्जचा त्याग हा आपण कधी विसरू शकत नाही.
आणीबाणीचा कालखंड हा एक वेगळा कालखंड होता. मी नुकताच महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात कार्यरत होतो. मला आठवतंय की, ही आणीबाणीची स्थिती आणि त्यासंदर्भातला काँग्रेसमधला निर्णय. आम्ही सगळे काँग्रेसमध्ये आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये एक अस्वस्थ असलेला फार मोठा वर्ग होता. त्यामध्ये आमच्यासारखे लोक हे सहभागी झालेले होते. मला आठवतंय की, हे इथलं चित्र बदलायच्या दृष्टीने आम्ही काही लोकांनी प्रयत्न सुरू केला. काँग्रेस पक्षामध्ये आम्ही वेगळा सवतासुभा मांडला. काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष झाले. एक इंदिरा काँग्रेस आणि दुसरा स्वर्ण सिंह यांच्या नेतृत्वाखालचं काँग्रेस (एस). त्या काँग्रेस (एस)मध्ये आम्ही लोक सगळे सहभागी झालेलो होतो. इथं निवडणुका झाल्या, महाराष्ट्रामध्ये जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही. निवडणुकीमध्ये एका बाजूला जनता पक्ष, दुसऱ्या बाजूने काँग्रेस (एस), तिसऱ्या बाजूने काँग्रेस (आय) ही स्थिती झालेली होती. काँग्रेस (आय) आणि काँग्रेस (एस) यांनी मिळून इथं सरकार बनवलं. मी त्या सरकारमध्ये होतो, पण आम्ही अस्वस्थ होतो. आम्हाला काँग्रेस (आय)बरोबर जायला मानसिक आमची तयारी नव्हती. म्हणून शेवटी जॉर्ज असेल, चंद्रशेखर असतील, मधू दंडवते असतील या सगळ्यांनी आम्ही लोकांनी एकत्रित बसून इथे निर्णय घेतला की, महाराष्ट्राचं सरकार हे बदलायचं! ते सरकारही इथे बदललं, माझ्या नेतृत्वाखालचं सरकार या ठिकाणी १९७८ साली स्थापन झालं. आणीबाणीचं पुरस्कार न करणारं हे सरकार या महाराष्ट्रात सत्तेमध्ये आलं. त्या सरकार स्थापनेत जॉर्ज फर्नांडिस यांचं फार मोठं योगदान होतं, ही गोष्ट मी जरूर या ठिकाणी सांगू शकतो.

त्या कालखंडामध्ये जॉर्ज फर्नांडिस हे प्रचंड लोकप्रिय नेते होते, संघटनेचे नेते होते. म्हणून आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे कधी संघर्ष करायचा असेल, ‘रेल्वे बंद’ करायची असेल, ‘मुंबई बंद’ करायची असेल तर तेवढी धमक आणि ताकद या राज्यामध्ये एकाच नेत्यामध्ये होती की, ज्यांनी जनतेचा विश्वास संपादित केला आणि त्यांचं नाव जॉर्ज फर्नांडिस! लोकांची मान्यता त्यांना किती होती? हे सांगण्याची अनेक उदाहरणं आहेत. पण मला आठवतंय ते एक उदाहरण, नुकत्याच निवडणुका आलेल्या होत्या. मुंबई शहर हे एक काळ असा होता की, या मुंबईचे अनभिषिक्त राजे एस. के. पाटील म्हणून ओळखले जायचे. स. का. पाटील! मुंबईमध्ये त्यांचं प्रचंड नियंत्रण होतं. काँग्रेसची संघटनात्मक शक्ती ही त्यांच्या मुठीत होती. पाटील साहेब सांगतील ते मुंबईमध्ये व्हायचं. पाटील साहेब सांगतील तो माणूस निवडून यायचा, हे चित्र मुंबईमध्ये होतं. पण लोकांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये हे नेतृत्व मान्य नव्हतं. पण निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करणं ही अशक्य गोष्ट आहे, हा जनमानसांमध्ये समज होता. त्या काळामध्ये जॉर्जने पाटील साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. मोठा गमतीदार प्रचार त्यांनी केला. मला आठवतंय की, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लागले. “You Can Defeat Patil” “तुम्ही पाटलांचा पराभव करू शकता.” सामान्य माणसाचा लोकशाहीचा मूलभूत अधिकार हा जागृत करण्याचं काम जॉर्ज फर्नांडिस यांनी केला. एस. के. पाटील जे मुंबईचे सर्व दृष्टीने शक्तिमान नेते होते, त्यांचा पराभव या मुंबईत झाला आणि तो जॉर्ज फर्नांडिसने त्या काळामध्ये केलेला होता. अशा अनेक गोष्टी या जॉर्जच्या संबंधी सांगता येतील.
जॉर्ज मंत्रिमंडळात गेले. कधीकाळी रस्त्यावरून संघर्ष करणारा हा नेता केंद्राचा मंत्री म्हणून आणि देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आपलं प्रभुत्व आणि आपलं कर्तुत्व गाजवणारा नेता म्हणून जॉर्जची ओळख सबंध देशाच्या पार्लमेंटमध्ये होते. ते रेल्वेमंत्री होते, उद्योग मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. मला आठवतंय ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला, ती कोकण रेल्वे! कोकण रेल्वेसाठी जॉर्जने एक बैठक बोलावली. मला बोलावलं, मधु दंडवतेंना बोलावलं, वीरेंद्र पाटील म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यांना बोलावलं, गोव्याचे मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांना बोलावलं आणि त्यानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि सांगितलं की काहीही झालं तरी आपल्याला ही रेल्वे करायची. पैशांची कमतरता आहे, इतके पैसे आम्ही घालू शकत नाही. मला एक वेगळी पॉलिसी तयार करायची आहे. रेल्वे बोर्डाच्या बाहेर ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन’ नावाची एक नवीन संस्था ही आपण सुरू करूया. सगळ्यांनी त्याच्यात भांडवली गुंतवणूक करूया आणि काहीही झालं तर आपण बाजारातून पैसे उभे करून ही कोकण रेल्वे आपण अस्तित्वात आणू. चर्चा झाली, सगळे होय म्हटले. पैशांचा प्रश्न आला. जॉर्जने आम्हाला सांगितलं ५०% रक्कम केंद्र सरकार देईल, बाकीचे तुम्ही राज्यांनी द्या. गोव्याने सांगितलं आम्हाला झेपणार नाही. केरळाने सांगितलं आमची करायची इच्छा आहे, पण आता आमची आर्थिक स्थिती ठीक नाही. कुठून तरी पैसे द्या आणि नंतर आम्ही परत करू. त्यामुळे आता हा जॉर्जचा दृष्टिकोन कृतीत येईल की नाही? याची शंका होती. जॉर्जने मला बाजूला घेतलं आणि मला सांगितलं की, “शरद काहीही करून हे आपल्याला करायचंय. ही दोन छोटी राज्य आहेत ती आता गुंतवणूक करू शकत नाहीत. आता त्यांच्या वतीने महाराष्ट्राने गुंतवणूक करावी. नंतर महाराष्ट्राचे पैसे परत करण्याचं काम ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन’ करेल” आणि ती रक्कम त्या दोन राज्यांची महाराष्ट्र सरकारने भरली. बाकीचे पैसे केंद्र सरकारकडून मिळाले आणि आज ही कोकण रेल्वे अस्तित्वात आली. त्याचं श्रेय माझ्या मते, जॉर्ज फर्नांडिस आणि मधु दंडवते यांना नक्की द्यावंच लागेल. आम्हा लोकांना त्याचा लाभ होता. त्यामुळे लाभधारक यांनी श्रेय घ्यायचं नसतं. पण ही संस्था उभं करणं त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका ही अत्यंत मोलाची असते. ती जॉर्जच्या या सगळ्या दृष्टिकोनामुळे आज होऊ शकलेली होती.
मला अतिशय समाधान एका गोष्टीचं आहे की, ज्या माणसाने कसलीही पार्श्वभूमी नसताना समाजासाठी आणि विशेषतः कष्टकऱ्यांसाठी अखंड आपल्या जीवनाचा मोठा काळ कधी वाया जाऊ दिला नाही, तो समाजाला अर्पित केला आणि हे सगळं करत असताना मर्यादित समाजकारण, राजकारण हे त्यांनी कधी केलं नाही. देशाचा विचार केला, देशाच्या सगळ्या भागांचा, सगळ्या विभागांचा विचार त्यांनी केला. अशा प्रकारचं एक नेतृत्व जॉर्जच्या रूपानं हे आपण सगळ्यांनी पाहिलं.
आज या दिवशी आपण जॉर्जची स्मरण या ठिकाणी करत आहोत. तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की, त्यांनी जी देशाची अखंड सेवा केली त्याचं स्मरण आपण ठेवूच. पण दुसऱ्या बाजूने या देशात मूलभूत विचार आहे, लोकशाहीची संकल्पना आहे. तिला जतन करण्यासाठी पडेल तो त्याग करण्याचं सूत्र ज्यांनी आपल्या आयुष्यभर सांभाळलं तो विचार आपल्याला सोडून चालणार नाही. आणीबाणी होती, इंदिरा गांधींना दोष दिला. त्यांचा हा निर्णय योग्य नव्हता हे सगळं खरं. पण पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली, ही गोष्टसुद्धा विसरता कामा नये. नंतरच्या काळामध्ये पुन्हा या देशातल्या जनतेने त्यांना संधी दिली, चित्र बदललं गेलेलं होतं.
आज माझ्या मते, पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे. तुमच्यापैकी जे वृत्तपत्रांमध्ये काम करतात त्यांना माहित असेल, बाकीच्यांना माहित नाही. आज वृत्तपत्र आपलं मत स्वच्छ मांडतंय. जे वृत्तपत्र त्यांचं मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या हेडक्वार्टरवरून फोन येतात. त्यांना सांगण्यात येतं की, “ही बातमी पुन्हा अशीच वापरू नका. अशी बातमी तुम्ही छापली, असा लेख तुम्ही लिहिला. अशी सरकारविरुद्ध भूमिका तुम्ही घेतली. तुमचं तुम्हीच ठरवा, आम्ही काही सांगू इच्छित नाही. पण काही झालं तर आमच्याकडे येऊ नका” एक प्रकारची धमकी आज पत्रकारांनासुद्धा दिली जाते. ह्या ‘अघोषित आणीबाणी’ आणि ‘घोषित आणीबाणी’ याच्यातला काय फरक आहे? याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे, असं मला अत्यंत प्रामाणिकपणाने वाटतं.
जॉर्ज फर्नांडिस यांचं खऱ्या अर्थाने स्मरण करायचं असेल तर, आम्ही काय वाटेल ती किंमत देऊ. पण हा देश हा संसदीय लोकशाहीवादी देश हा अखंड राहील. त्यासाठी जे करावं लागेल, ते करण्याची तयारी आम्हा सगळ्यांची राहील. हा दृष्टिकोन ठेवून आपण पुढे जायला पाहिजे आणि तेच करायला तुम्हा सर्वांची साथ मिळेल, याचा मला विश्वास आहे. कपिल पाटील त्यांचे सगळे सहकारी आणि जॉर्ज साहेबांचे सगळे सहकारी यांनी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श, एक तत्त्वज्ञान ठरवलेलं आहे. त्या सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आज जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये आपण सगळेजण एकत्र राहू. प्रसंग येईल त्यावेळेला रस्त्यावर सुद्धा उभे राहू आणि जॉर्जचा आदर्श याचं स्मरण ठेवू, एवढंच या ठिकाणी सांगतो.
धन्यवाद!