‘गाव करील ते राव काय करील’ – सौंदाळा गावाने राज्याची पुरोगामी परंपरा जपली

Saundala

अहिल्यानगर : विज्ञानवादी समाज निर्माण करण्यासाठी आपल्या राज्यातील सुधारकांनी, संतांनी सतत पुरोगामी चळवळी केल्या. सौंदाळा गावाने जातमुक्त होण्याचा घेतलेला निर्णय हा देशासाठी मार्गदर्शक ठरेल. विवेकनिष्ठ मूल्ये हेच आपल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी केले.

राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सौंदाळा येथे सरपंच शरद आरगडे आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आरगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वधर्मसमभाव हे संविधानिक मूल्य रुजविण्यासाठी गावाने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आणि कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी अजित शिंदे, राष्ट्रीय सचिव डॉ. सागर भालेराव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे, राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, अरुण जाधव, छात्रभारतीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले, हिरालाल पगडाल,ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष योगेश पाटील तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, कोरो इंडियाचे महेंद्र रोकडे आदी उपस्थित होते.

‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीप्रमाणे गावाने एकत्रितपणे जातमुक्त आणि धर्ममुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एकीचे बळ काय असते, हे गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

देशपातळीवर सध्या ग्रामविकास होत आहे. महात्मा गांधी यांच्या संकल्पनेनुसार गावांचा विकास व्हावा, याचे उत्तम उदाहरण सौंदाळा गावाने घालून दिले आहे. गावकऱ्यांनी जात आणि धर्म यापलीकडे जाऊन एकोप्याने काम केले आहे. या गावाचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा, असे मत राजा कांदळकर आणि डॉ. सागर भालेराव यांनी व्यक्त केले.

महिलांच्या पुढाकाराने गावाने घेतलेला हा निर्णय अत्यंत क्रांतिकारी असून, शिवी देणाऱ्याला ५०० रुपयांचा दंड देण्याचा निर्णय सर्वांनीच अमलात आणावा, असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले. तसेच सरपंच शरद आरगडे आणि त्यांचे वडील बाबा आरगडे हे खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांचे वारस असल्याचे मत अरुण जाधव यांनी व्यक्त केले.

राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनांनी सौंदाळा सारखे उपक्रम देशभरातील गावखेड्यांमध्ये राबवावेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी गावकऱ्यांना पोतेभर पुस्तके भेट दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त समतेचा विचार पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील किमान २०० खेड्यांमध्ये हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सागर भालेराव यांनी केले.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top