अदिती पवार | 4 फेब्रुवारी 2026
लोककला ही संज्ञा नागरीकरण न झालेल्या आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी योजिली जाते. निसर्गाशी संवाद साधत जगणाऱ्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखली जाते. त्यात नृत्य, नाट्य, संगीत, गाणी आदीं प्रयोगात्मक किंवा प्रायोगिक कलांचा अंतर्भाव होतो. लोकजीवनात गीत,नृत्य,नाट्य, हस्तकला इत्यादी सर्वच आविष्कार दैनंदिन गरजेचा भाग म्हणून आविष्कृत होतात. या लोककलांचे वहन परंपरेने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे होते. हे वहन कधीकधी मौखिक स्वरूपात होते. लोककलांच्या या मौखिक परंपरेचा कर्ता बऱ्याचदा ज्ञात नसतो. लोकांनी लोकांसाठी लोकांमधून तयार केलेले आविष्कार म्हणजे लोककला. या लोककलांना बांधणारा घट्ट धागा असतो तो परंपरेचा. ही परंपरा समूहाने तयार झालेल्या विविध संकेतांमधून सिद्ध होते.
महाराष्ट्राला लोककलेची जन्मभूमी म्हटले जाते. इथल्या मातीत परंपरेची उब आहे, ताल, लय आहे आणि लोकजीवनाशी नाळ जुळलेल्या कलांचे अनमोल वैभव आहे. आज ही जुन्या मराठी गाण्यांकडे एक नजर टाकली तर त्यातील अनेक गाणी आजही ऐकली की खूप छान वाटतं. कधी कधी तर एखादं साधं गाणंसुद्धा तालवादकामुळे उठून व बहरून येते. सध्याच्या काळात ढोलकीचा असा जादुई वापर ‘नटरंग’, ‘चंद्रा’ या सिनेमातून दिसून आला. बऱ्याच मराठी चित्रपटातील गाण्यात आपल्या मराठी कलाकारांनी ज्या प्रकारे ढोलकी वाजवली आहे ती केवळ लाजववाब!

अशीच कमाल करणारे मोठे ढोलकीपटू महाराष्ट्रात होऊन गेले ते म्हणजे महाराष्ट्र ढोलकी भूषण राम जामगावकर .
सध्याच्या काळात रॉक संगीत ऐकून आपले पाय थिराकतात. जुन्या जमान्यात मात्र ज्या गाण्यांना ढोलकीची साथ असायची ती गाणी वातावरणात एक वेगळाच माहोल निर्माण करायची. याच जमान्याचे साक्षीदार म्हणजे ढोलकीपटू राम जामगावकार.
१५ जुलै, १९३९ साली त्यांचा जन्म मुंबईतील गिरणगावात झाला. त्यांचे वडील दगडू जामगावकार हे मुंबई महानगरपालिकेत त्या काळी काम करायचे, पण त्याच बरोबर ते विख्यात पखवाज वादकही होते. वडिलांचे तेच गुण मुलामध्ये उतरले. शाळेच्या अभ्यासात जास्त गोडी न दाखवता, शाळेतून आल्यावर आपलं दप्तर बाजूला फेकून भातुकलीच्या खेळामध्ये लग्नं लावताना त्यांनी चिनपाट वाजवायला सुरूवात केली. लहानपणापासूनच त्यांच्यावर वगनाट्याचे,लावण्यांचे आणि भजनवारीचे संस्कार झाले.त्यामुळे घरात असलेले डबे किंवा जी काही वस्तू हातात दिसेल ते ती वाजवत सुटायचे.

त्यांच्या वडिलांना कळलं की आपल्या मुलाला अभ्यासात आवड नाहीये, म्हणून मग त्यांनी आपल्या सोबत असणारे सहकारी साटम गुरुजी, त्यांच्याकडे त्यांना शिकवण्यास पाठवले. साटम गुरुजी हे त्या काळातले उत्तम पखवाज आणि मृदुंग वादक होते. त्यांच्याकडे राम यांनी ढोलकी शिकायला सुरुवात केली. इथूनच राम जामगावकर यांनी आपल्या लोककलेचा श्री गणेशा सुरू केला…
एकदा राम वडिलांसोबत साटम बुवांचा दुरुस्तीसाठी दिलेला पखवाज आणायला गेले होते, तिथेच त्यांना एक ढोलकी दिसली. ढोलकी दिसताच एक कुतूहल म्हणून त्या ढोलकी वर त्यांनी थाप मारली. राम जी ढोलकी वाजवत होते ती शाहीर साबळेंची ढोलकी निघाली. ढोलकी न्यायला आलेले शाहीर साबळे यांचे सहाय्यक त्यांचे ढोलकी वादन ऐकत उभे होते. रामचं ढोलकी वादन ऐकून ते त्यांना शाहीर साबळे यांच्याकडे घेऊन गेले आणि शाहिरांसमोर ढोलकी वर थाप मारायला सांगितली. शहिरांसमोर रामने ढोलकी वादन सुरू केले. त्यांची ढोलकी ऐकून शाहीर खूप प्रभावित आणि चकित झाले.

त्याच क्षणी शाहीरांनी रामच्या गळ्यात आपली ढोलकी घातली. त्याआधी शाहीर साबळे स्वतःच ढोलकी वाजवायचे, परंतु त्यांनी राम यांच्यावर विश्वास ठेवला आणि आशाप्रकारे राम जामगावकर यांचा ढोलकी वादनाचा प्रवास सुरू झाला.
शाहीरांच्या ‘मडकाला चढली भांग’, ‘आंधळं दळतंय’, ‘बापाचा बाप’, ‘कोंडू हवालदार’ अशा बऱ्याच प्रसिद्ध लोकनाट्यांमधून आणि वगनाट्यांमधून राम यांच्या ढोलकीचा आवाज घुमू लागला. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत साथ संगत केली. पुढे संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे ‘नवरंग’, ‘दो आंखे बारह हाथ’, ‘बायांनो नवरे सांभाळा’ या सिनेमांमधून राम जामगावकर यांची ढोलकी निनादू लागली. राम यांनी त्यांच्यासोबत भारतभर दौरा सुद्धा केला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, श्रीनिवास खळे अशा बऱ्याच संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं. शाहीर विठ्ठल उमप,लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर अशा अनेक गायकांसोबत ढोलकीची साथसंगत केली.

प्रल्हाद शिंदेंच्या ‘चल ग सखे पंढरीला’, ‘दर्शन दे रे भगवंता’, ‘आता तरी देवा मला पावशील का’,’मळ्याच्या मळ्यामदी कोण ग उभी’, पांडुरंग वनमाळी यांचं ‘कावळा पिपेरी वाजवतो’ अशा अनेक गाजलेल्या गीतांना राम जामगावकर यांची ढोलकी वाजवून बहार आणली. ‘अरे कृष्णा अरे कान्हा’ या गाण्यात राम यांनी विशेष म्हणजे तबला आणि ढोलकी एकट्याने वाजवलेली आहे. सुप्रसिद्ध लावणी गायिका सुलोचना चव्हाण उर्फ माई, यांच्यासोबत ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘कळीदार कपुरी पान’ अशा सुप्रसिद्ध गाण्यांवर सुद्धा साथ संगत केलेली आहे. ही चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत या गाण्यात तर त्यांनी त्यांची कमाल जादू केलेली दिसते.

राम यांनी रजनी केमकर, संजीवनी बीडकर, माया जाधव अशा अनेक नृत्यांगिनी सोबत सुद्धा काम केलं.
माया जाधव यांनी त्या काळात राम जामगावकर यांच्या ढोलकीच्या ठेक्याचा सखोल अभ्यास केला. त्या ठेक्यावर लावणी कशी सादर करायची, पावले कशी थिरकवायची, घुंगरू कसे वाजवायचे—या सगळ्या बारकाव्यांचा अभ्यास करून त्यांनी राम जामगावकर यांच्या ढोलकीवर सुंदर लावणी सादर केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माया जाधव यांना लावणीतील या सर्व बारकाव्यांची जाणीव होऊ लागली.
राम जामगावकर यांच्या बोटात एक अनोखी अंगठी असायची. ती अंगठी साधीसुधी नव्हे तर ढोलकीच्या प्रतिमेची होती. एकदा शाहाजी राव म्हणजे त्यांचे मित्र यांनी त्यांना विचारलं की या अंगठी बद्दल जरा सांगा. तर राम म्हणाले, ही अंगठी मला एका मोठ्या व्यक्तीने दिलेली आहे. ती व्यक्ति म्हणजे आशा भोसले. तर किस्सा असा की एक वसंत देसाई यांचं रेकॉर्डिंग होतं आणि आशा ताई गाणार होत्या. आशा ताई राम यांच्या ढोलकीवर फिदा झाल्या. राम सोबत त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांना रामचं वाजवणं फार आवडायचं म्हणून त्यांनी खास ढोलकीच्या प्रतिमेची सोन्याची अंगठी भेट म्हणून राम यांना दिली. ती अंगठी त्यांनी कधी आपल्या बोटातून काढली नाही.

राम हे फक्त ढोलकी पटू नाही तर अभिनय ही उत्तम करायचे आणि विनोद त्यांच्याअंगा अंगात भरलेला होता. असा व्यक्ति जो सगळ्यांना भरपूर हसवायचा आणि अंगमंचावर आल्यावर बिलकुल घाबरायचे नाही.
आज हीच परंपरा त्यांचा नातू वेदांत जामगावकर पुढे नेण्याचं काम करत आहे. त्याने स्वतः आपल्या कुटुंबाच्या व आपल्या काही मित्रांच्या सहाय्याने एक आगळावेगळा कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे ‘नाद तालवादकाचा’.

या मध्ये महाराष्ट्रातील जे महान तालवादक होऊन गेले त्यांच्यावर कलाकृतीवर आधारित गायन-वादन केले जाते. अण्णा जोशी, पंडित विधाते, पंडित रमाकांत म्हापसेकर, अर्जुन शेजवळ, राजाराम जामसांडेकर, लाला भाऊ गंगावणे, पांडुरंग घोटकर या प्रसिद्ध तालवादाकांसोबतच राम जामगावकर यांच्या कलाकृतीवर कार्यक्रम केला जातो. या सगळ्यांनीच महाराष्ट्राला अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी दिली. आज याच कलाकारांमुळे आपली परंपरा आणि आपली संस्कृती आज स्वतंत्र ठसा उमटवते आहे. या सर्वांच्या जादुई बोटांनी महाराष्ट्राला किती तरी गाणी दिली, आज तीच गाणी अजरामर आहेत!
राम जामगावकर यांच्यासाठी आपले आई वडील ढोलकीवादनच , आपली जननी ढोलकीवादनच आणि आपलं कर्म सुद्धा ढोलकीवादनच. महाराष्ट्र ढोलकी भूषण असलेले राम जामगावकर आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरीही अप्रतिम ढोलकी वादन केलेली त्यांची गाणी सदैव त्यांचं स्मरण देत राहतील.
अदिती पवार या लोककला आणि संस्कृती यावर प्रामुख्याने काम करतात, हा त्यांच्या आवडीचा आणि संशोधनाचा विषय आहे. मराठी समाजातील परंपरा, कला आणि तिच्या जपणुकीवर त्या सातत्याने लेखन करत असतात.



