द सिक्रेट लाईफ ऑफ अ फंडरेझर – सामाजिक संस्थांसाठी निधी संकलनाचा दस्तावेज

रवींद्र नन्नवरे, मुंबई

निधी संकलनाच्या (फंडरेझिंग) विविध पद्धती, त्याचे कार्यक्षेत्र आणि एकूणच ‘फंडरेझिंग इकोसिस्टिम’ समजून घ्यायची असेल, तर वासिफ हानी लिखित ‘द सिक्रेट लाईफ ऑफ अ फंडरेझर’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. हे पुस्तक २०२५ मध्ये प्रकाशित झाले आहे. लेखक वासिफ हानी हे मूळचे बँकर असून, त्यांनी आखाती देशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून समाजकार्य क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि समाजातील अत्यंत वंचित घटकांसाठी काम करण्यास सुरुवात केली.‘द सिक्रेट लाईफ ऑफ अ फंडरेझर’ हे २०१ पानांचे पुस्तक असून ते १० प्रकरणांमध्ये विभागले आहे. लेखकाने या पुस्तकात स्वतःचा निधी संकलक (फंडरेझर) म्हणून झालेला प्रवास आणि संस्थेचे काम सुरळीत चालू राहावे, यासाठी निधी उभारणीचे केलेले प्रयत्न मांडले आहेत. कुठल्याही सामाजिक कार्यासाठी पैसा उभा करणे हे दिव्य असते. सामाजिक बदलासाठी देणगीदारांकडून पैसा उभा करणे हे जिकीरीचे काम असते. या क्षेत्रात किंबहुना डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

समाजकार्य करत असताना पैशांची उभारणी कशी करावी? ती कुठून करावी? समाजकार्यासाठी स्वयंसेवी संस्थांना पैसे देऊन त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम करणारे लोक कोण आहेत? भारतामध्ये उद्योजकांना त्यांच्या नफ्यातून २% रक्कम जनतेच्या भल्यासाठी खर्च करणे कोणत्या कायद्यान्वये बंधनकारक आहे? असे कायदे जगभरात कुठे-कुठे आहेत आणि भारतातील कायदा कसा वेगळा आहे? निधी संकलनाच्या नवीन पद्धती आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला मिळतात. जर तुम्ही स्वयंसेवी संस्था चालवत असाल, भविष्यात संस्था सुरू करू इच्छित असाल किंवा निधी संकलन क्षेत्रात काम करण्याची तुमची इच्छा असेल; तसेच, सध्या या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला तुमचे ज्ञान वृद्धिंगत करायचे असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकते.

जेव्हा आपण समाजकार्य क्षेत्रात नवीन असतो, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात डोनर्स किंवा फंडर्स तुमची दखल न घेण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याचदा डोनर्स समोरासमोर भेटले की आश्वासन देतात, पण काहीही कारण न देता अचानक गायब होण्याची मोठी शक्यता असते. याला लेखकाने ‘गोस्टिंग’ (Ghosting) असा शब्दप्रयोग केला आहे. लेखक म्हणतात की, निधी संकलनाचे काम तसे कठीण नक्कीच आहे, परंतु अशक्य मुळीच नाही. लोक तुमच्या प्रस्तावाला प्रतिसाद देणार नाहीत; ‘मेल टाका, आम्ही मेलला उत्तर देतो’ असे सांगून ते तुम्हाला टाळतील. काही डोनर्स पूर्णपणे गायब होतील. कधीकधी तुम्ही खूप निराश व्हाल, काही वेळा रडूही येईल आणि एखाद्या दिवशी वाटेल की आता पुरे झाले; पण अशा परिस्थितीत आपण हार न मानता आपले काम करत राहायला हवे, असे लेखक सांगतात. या पुस्तकाची मुख्य कल्पना अशी आहे की, निधी संकलन म्हणजे केवळ पैसा गोळा करणे नाही, तर ती त्यापेक्षा खूप पुढे जाणारी प्रक्रिया आहे. या पुस्तकातून मिळणारी शिकवण म्हणजे काम करत असताना कितीही नकारात्मक अनुभव आले तरी लोकांवर आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवणे फार महत्त्वाचे आहे. कारण काही काळानंतर किंवा काही वर्षांनी तुम्ही संभाव्य डोनर्स म्हणून ज्यांच्यापर्यंत पोहोचला आहात, त्यांच्याकडून निश्चितच साथ मिळते. पुस्तकात लेखकाने अशा अनेक प्रसंगांचे वर्णन केले आहे जिथे तुमची भूमिका फक्त निधी उभारण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर लोकांशी नाती निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे असते.

पहिल्या प्रकरणाचे शीर्षक ‘लोन रेंजर्स हंट’ (Lone Ranger’s Hunt) असे आहे. यात लेखक सांगतात, सुरुवातीच्या टप्प्यात निधी संकलन करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या कारण ते समाजकार्य क्षेत्रात नवीन होते. तरीही हार न मानता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी या क्षेत्रात काम सुरू ठेवले आणि निधी संकलनाच्या जगात स्थिर राहिले. हे काम करत असताना त्यांनी निधी शोधण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला. यात वेक-अप कॉल्स (Wake-up Calls), द लोकेशन हॅक (The Location Hack), बियॉन्ड द लोकेशन (Beyond the Location), द गुगल डीप डाईव्ह (The Google Deep Dive), द ग्रेट इंडिया डायल-अ-थॉन (The Great India Dial-A-Thon) आणि द लिंक्डइन गॅम्बल (The LinkedIn Gamble) यांचा समावेश आहे.
दुसरे प्रकरण ‘द सोशल सेक्टर लँडस्केप इन इंडिया’ असून, यात भारतातील सामाजिक क्षेत्राची सखोल माहिती मिळते. एनजीओंच्या पलीकडे जाऊन या क्षेत्रात सरकारी यंत्रणा, फिलान्थ्रॉपी करणाऱ्या संस्था, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) आणि स्थानिक स्तरावरच्या सामाजिक चळवळी या सर्वांचा एकत्रित सहभाग असतो. हे सर्व मिळून भारतातील गंभीर समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. या विशाल परिसंस्थेमध्ये सामाजिक क्षेत्र हे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या मधील पोकळी भरून काढते आणि सर्वात मागे राहिलेल्या व वंचित समुदायासाठी काम करते, अशी मांडणी पुस्तकात केली आहे.

‘मेनी फेसेस ऑफ गिव्हिंग’ या तिसऱ्या प्रकरणात लेखक विविध प्रकारच्या डोनर्सची ओळख करून देतात. यात कॉर्पोरेट्स, फाउंडेशन आणि रिटेल देणगीदार यांचा समावेश होतो. यामध्ये हाय नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्स (HNI) आणि मनापासून देणगी देणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. याच प्रकरणात लेखकाने जगभरातील सी.एस.आर. (CSR) आणि त्यांच्या कार्यपद्धतींचाही ऊहापोह केला आहे. लेखक लिहितात की, प्रस्ताव (Proposals) अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तयार केले पाहिजेत. त्यांच्या मते, प्रपोजल म्हणजे निधी संकलकाच्या कल्पनेचा आणि डोनरच्या बांधिलकीचा पूल असतो. प्रपोजल हे आपण पाहिलेले स्वप्न असते आणि ते स्वप्नांना आकड्यांत, भावनांना प्रभावकथनांत आणि आकांक्षांना एका संरचित योजनेत रूपांतरित करत असते. निधी संकलनाचे प्रपोजल बनवत असताना त्यामध्ये आपण केलेल्या कामाची आकडेवारी, इम्पॅक्ट स्टोरीज आणि फोटो असावेत, कारण ते संस्थेने जमिनीवर केलेले काम आणि लोकांच्या आयुष्यात आलेले बदल स्पष्टपणे दाखवतात. चौथ्या प्रकरणाचे नाव ‘आर्ट अँड सायन्स ऑफ प्रपोजल्स’ आहे. यात प्रपोजलमध्ये आपण आपल्या कामाचा परिणाम दाखवण्यासाठी आकडे टाकतो (जसे की ‘इतक्या लोकांवर प्रभाव पाडला’ किंवा ‘अमुक लाख लोकांना लाभ मिळाला’). लेखक लिहितात की हे आकडे महत्त्वाचे आहेत, पण शेवटी डोनर्स सुद्धा माणसेच असतात. त्यामुळे आपल्या कामावर त्यांचे लक्ष वेधण्यासाठी फोटो आणि केस स्टडी लिहिणे आवश्यक आहे. फोटो स्वतः कथा सांगतात आणि आकड्यांपेक्षा जास्त प्रभाव टाकतात. लेखक पुढे सांगतात की, डोनर्स कोणत्याही क्षणी आपल्याकडे त्यांच्या पसंतीच्या फॉरमॅटमध्ये प्रपोजल मागू शकतात. त्यामुळे निधी संकलकांनी विविध प्रकारचे प्रपोजल टेम्पलेट्स तयार ठेवावेत, जेणेकरून ते त्वरित संस्थेच्या सी.ई.ओ. किंवा फंडिंग एजन्सीकडे पाठवता येतील आणि वेळेत काम करता येईल.

पाचव्या प्रकरणात ‘चेजिंग येस’ (Chasing Yes) मध्ये लेखकाचे स्वतःचे अनुभव कथन करताना म्हटले आहे कि, त्यांनी एका डोनरला चारपेक्षा जास्त ईमेल पाठवले तरीही प्रतिसाद मिळाला नव्हता. एके दिवशी अचानक त्यांना एक अनोळखी कॉल आला. त्या व्यक्तीने सांगितले, ‘मी अलीकडेच या पदावर आलो असून माझ्या आधीच्या अधिकाऱ्याच्या (Predecessor) इनबॉक्समध्ये तुमचे ई-मेल पाहिले. तुमचा मेल वाचला आणि मला तुमचे काम समजून घेण्याची उत्सुकता वाटली. तुमची संस्था नक्की काय काम करते, कृपया सांगाल का?’ ही घटना सांगण्याचे कारण म्हणजे, आपण ज्यांना संपर्क करत आहोत तिथे आपल्या कामाला दाद देणारी माणसं उशिरा का होईना येतात आणि आपले काम समजून घेतात. त्यामुळे निधी संकलनात आणि आयुष्यातही सतत दार ठोठावत राहिले पाहिजे, जेणेकरून कधी ना कधी सकारात्मक बदल आणि प्रतिसाद मिळेल. त्याच प्रकरणात लेखक आणखी एक उदाहरण देतात. दुबईतील एका सी.एस.आर. कंपनीला विनंती केली असता ते पहिल्यांदा निधी देऊ शकले नाहीत, त्यावेळी लेखक निराश झाले होते. पण काही महिन्यांनी त्याच व्यक्तीने फोन करून त्यांच्या सी.एस.आर. अंतर्गत लॅपटॉप देण्याची ऑफर केली. म्हणून संस्था प्रमुखांनी लक्षात घेतले पाहिजे की, जर तुम्हाला पहिल्यांदा नकार मिळाला तर त्याचा अर्थ डोनर आणि आपला संबंध संपला असे होत नाही. उलट भविष्याचा विचार करून डोनर्स आपल्याला कशा वेगवेगळ्या मार्गाने अथवा रूपाने मदत करू शकतात, हे लक्षात घेऊन निधी संकलकांनी व्यापक विचार करायला हवा. या पुस्तकातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे सातवे प्रकरण ‘बिकमिंग द वर्ल्डस् ग्रेटेस्ट रिलेशनशिप मॅनेजर’. या प्रकरणात लेखक मांडतात, एक उत्कृष्ट रिलेशनशिप मॅनेजर केवळ संपर्क साधण्याचे काम करत नाही, तर देणगीदारांचा दीर्घकालीन विश्वास संपादन करतो. प्रत्येक संवाद, गप्पा, वाटाघाटी, फॉलो-अप असा असावा की समोरच्या व्यक्तीला स्वतःला महत्त्वपूर्ण आणि चांगले वाटेल. फंडरेझर म्हणून आपण ज्या बाह्य डोनर्सशी व्यवहार करतो, तेच सर्वांना दिसतात. परंतु दुसरीकडे, आपण संस्थेच्या अंतर्गत परिसंस्थेशीही काम करतो, ज्यात फायनान्स, एच.आर., प्रोक्युअरमेंट आणि कम्युनिकेशन तसेच इतर अनेक विभागांचा समावेश होतो. म्हणून काम करत असताना लेखक सांगतात की, आपण फार काळजी घेऊन सर्वांसोबत मित्रत्वाचे नाते निर्माण करायला हवे, जेणेकरून काम सोपे आणि लवकर होईल. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि सहानुभूती दाखवावी. आजकालच्या कार्यस्थळांमध्ये ही गोष्ट अनेकदा कमी दिसते; त्यामुळे हे शिकणे अधिक महत्त्वाचे असून याचे अनुकरण समाजकार्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जरूर करावे, असे लेखक वारंवार सांगतात.

आठव्या प्रकरणात ‘इमोशनल इंटेलिजन्स ऑफ अ फंडरेझर’ मध्ये प्रत्येक मोठ्या आणि दीर्घकालीन डोनरसोबतचे नातेसंबंध टिकवायचे असतील, तर त्यांच्या भावना आणि सहानुभूतीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर शुक्रवारी रात्री एखाद्या डोनरने अतिरिक्त रिपोर्ट मागितला आणि विकेंड आहे असे समजून तुम्ही कोणतीही हालचाल न करता शांत राहत असाल, तर समाजकार्य क्षेत्रात फंडरेझिंग करणे हा तुमचा प्रांत नाही. लेखकाची ही मांडणी मला खूप आवडली. कारण डॉक्युमेंटेशनचे काम करत असताना मी अनेकदा डोनर्सना डेडलाईन्सनुसार रिपोर्ट देत असतो. संस्थाही त्यांना ‘तुम्ही एवढ्या कमी वेळेत डेटा का मागता’ असे विचारत नाही, कारण डोनर्ससमोर असहकार्य दिसू नये ही भीती असते. त्यामुळे फंडरेझर म्हणून काम करत असताना डोनरच्या वेळापत्रकानुसार काम झाले नाही, तर नातेसंबंध बिघडू शकतात, जे एन.जी.ओ. ना परवडणारे नसते. पुढे या प्रकरणातील एक वाक्य माझ्या मनात कायमचे राहिले, ते म्हणजे निधी संकलनात एक ‘गोल्डन रूल’ आपण लक्षात ठेवला पाहिजे, ‘तुम्हाला फक्त बोलण्यासाठी पैसे (डोनेशन) मिळत नाहीत, तर ऐकण्यासाठीही मिळतात’. लेखक पुढे सांगतात की, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काम करत असताना आपल्या समोरील लोक जेव्हा बोलत नाहीत, तेव्हा न बोललेल्या संकेतांकडे लक्ष देणे विशेष गरजेचे असते. ज्यात देहबोली, त्यांच्या आवाजातील उतार-चढाव किंवा उत्तर देण्यापूर्वी आलेला छोटासा विराम यावर लक्ष दिले, तर डोनरला आपल्याबद्दल काय वाटत आहे हे लगेच आपल्या लक्षात येईल आणि संभाव्य धोके आपण टाळू शकतो. एखादा व्यक्ती प्रत्यक्षात काय अनुभवत आहे ते जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या नजरेला नजर देऊन बघा. बऱ्याचदा बोलणाऱ्यांचे शब्द बनावटी असू शकतात, तसेच स्मितही खोटे असू शकते, पण त्यांचे डोळे मात्र खरे बोलत असतात. त्यामुळे डोनर्सशी संवाद साधताना त्यांच्या नजरेला नजर देणे महत्त्वाचे आहे. त्यातून त्यांना आपल्याबद्दल अथवा आपल्या संस्थेबद्दल काय वाटते ते समजते. या प्रकरणात त्यांनी एक फ्रेमवर्क दिले आहे, ज्यात ते लिहितात की, फंडरेझर म्हणून आपल्याला उत्तम श्रोता होणे (Active Listening), आपल्या ट्रिगर्सवर नियंत्रण ठेवणे, शब्दांचे भावार्थ, मथितार्थ समजून घेणे, कुतूहल जागे ठेवणे आणि सहानुभूतीने नेतृत्व करणे हे सतत करायला हवे. यामुळे डोनर्ससोबत संबंध बळकट होण्यास मदत होते. नवव्या प्रकरणात ‘पॉवर ऑफ व्हॉलंटिअरिंग इन फंडरेझिंग’ आणि दहाव्या प्रकरणात ‘बियॉन्ड द गिव्हिंग’ बद्दल चर्चा केली आहे. दहाव्या प्रकरणात लेखक ‘ग्रॅटिट्यूड सायकल’ (Gratitude Cycle) ची ओळख करून देतात. ते सांगतात की फंडरेझिंगमध्ये मूल्यांची (values) भूमिका खूप महत्त्वाची असते. फंडरेझर म्हणून आपल्याला देणगीदारांचा विचार आणि देणगी देण्यामागील प्रेरणा समजून घ्यावी लागते. त्यानंतर फंडरेझर जितका सक्षम, तितका त्यांच्यावरचा डोनर्सचा विश्वास वाढतो. ‘इनटँजिबल बेनिफिट्स’ (अमूर्त फायदे) हा भागही महत्त्वाचा आहे. या क्षेत्रात असे बरेच डोनर्स आहेत जे फक्त करसवलतीसाठी देणगी देत नाहीत, तर समाजात खरंच बदल व्हावा आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या भावनिक समाधानासाठी ते डोनेशन देत असतात.

संपूर्ण पुस्तक वाचताना मला या पुस्तकाच्या काही मर्यादाही प्रकर्षाने जाणवल्या. पहिली मर्यादा म्हणजे, हे पुस्तक इंग्रजीत असल्याने ज्यांना इंग्रजी भाषा अवगत नाही, अशा वंचित समुहासोबत (Grassroots) कामा करणाऱ्या संस्थांना याचा पुरेपूर फायदा घेता येणार नाही; कारण त्यांचे कामकाज बहुतांश प्रादेशिक किंवा इतर स्थानिक भाषांमधून चालते. दुसरी मर्यादा म्हणजे, ‘निधी संकलन करताना कधीही हार मानू नये आणि सतत प्रयत्न करत राहावे’, असे लेखक म्हणतात. परंतु, जर या क्षेत्रात तुमची ओळख (Network) नसेल, तर निधी मिळवणे अत्यंत कठीण असते. समाजकार्य क्षेत्रातील या नकारात्मक वास्तवावर लेखक फारसे बोलताना दिसत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर, डोनरसोबतचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी ‘कृतज्ञता’ हे मुख्य साधन असले, तरी त्याआधी तुमचे भक्कम ‘नेटवर्क’ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर नेटवर्क नसेल, तर या क्षेत्रात टिकून राहणे नक्कीच आव्हानात्मक ठरू शकते.
तिसरी मर्यादा म्हणजे पुस्तक सामाजिक क्षेत्रातील नेटवर्क बद्दल बोलताना Social Capital आणि त्याचे फायदे कुणाला होतात आणि होत आहेत त्यावर बोलतांना दिसत नाही. उदारणार्थ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जेम्स कोलमन यांनी ‘सामाजिक भांडवल’ (Social Capital) नावाची एक संकल्पना मांडली आहे. त्यांच्या सिद्धांतानुसार मानव आपली कामं पूर्ण करण्यासाठी तो आपल्या ओळखींचा आणि सामाजिक संबंधांचा पुरेपूर वापर करतो आणि स्वताचा फायदा करून घेत असतो. कोलमन यांच्या मते, माणसा-माणसांमधील हे नातेसंबंध म्हणजेच खरे ‘सामाजिक भांडवल’ होय. भारतात हे भांडवल संयुक्त कुटुंब, जात, धर्म आणि नातेवाइकांच्या रूपात स्पष्ट दिसते. ही केवळ एक पुस्तकी संकल्पना नसून, रोजच्या व्यवहारात वापरता येणारे हे एक प्रभावी साधन आहे. लोक आपली ध्येये गाठण्यासाठी या नात्यांचा हुशारीने वापर करतात. भारतीय संदर्भात बोलायचे झाले तर, नात्यांमधील नियम, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यामध्येच हे भांडवल टिकून आहे. समाजात प्रगती करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करता आपल्याला लक्षात येईल कि, भारतामध्ये ज्ञानापेक्षा तुमची जात कुठली आहे त्यावर बऱ्याच गोष्टी ठरत असतात. लहानपणापासून एक म्हण ऐकत आलो आहे ‘आपला माणूस आहे, जातीने लक्ष द्या’ म्हणजेच आपल्या जातीचा व्यक्ती आहे काम झाले पाहिजे’. सदर पुस्तक भारतीय जातव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाष्य करत नाही. तसेच सी.एस.आर. मधून येणाऱ्या पैशावर राजकीय पक्ष डल्ला मारण्यासाठी तयार असतात आणि त्यानुसार काम सुद्धा होतात पण त्याचा उल्लेख पुस्तकात होताना दिसत नाही त्यामुळे पुस्तक जर उत्तम असले तरी काही मुद्द्यांना स्पर्श केला असता तर अधिक वास्तवादी माहिती समोर आली असती.

पुस्तकाचे नाव – द सिक्रेट लाईफ ऑफ अ फंडरेझर
लेखक – वासिफ हानी
प्रकाशक : नोशन प्रेस
किंमत : ३७४ रुपये
बांधणी : हार्ड कव्हर


रवींद्र नन्नवरे हे मुंबईस्थित समाजकार्य क्षेत्रातील कार्यकर्ते आणि अभ्यासक आहेत. निधी संकलन, डोनर रिलेशनशिप, डॉक्युमेंटेशन आणि सामाजिक संस्थांच्या टिकावूपणाशी संबंधित विषयांवर त्यांचा प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव आहे. ग्रासरूट स्तरावर काम करत असताना मिळालेल्या अनुभवांच्या आधारे ते समाजकार्य क्षेत्रातील धोरणे, प्रक्रिया आणि वास्तव यांचे चिकित्सक लेखन करतात.

Email- ravinannavare93@gmail.com

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

मराठी
  • English
  • हिन्दी
  • मराठी
  • Scroll to Top